पावसाची एक आठवण

माझे घर डोंबिवलीला आणि कॉलेज ठाण्याला होते. कॉलेजमधुन घरी जाताना पावसात भिजायला खूप मजा यायची. मुंबईच्या धो धो पावसात छत्रिचा काहीच उपयोग नसतो. 25 वर्षांपूर्वी , आताच्या मानाने रस्ते खुपच मोकळे असायचे. तेव्हा मैत्रिणिंच्या घोळक्यात बिनधास्त , एकमेकिंच्या अंगावर पाणि उडवत , हसत खिदळत , भिजून घरी जायचो. खूप तणावविरहित दिवस होते ते. लोकल ने घरी जाताना दिवा स्टेशन गेल्यावर डोंबिवलिच्या खाडीचा परिसर हिरवागार झालेला असायचा. संध्याकाळी खूप उशीर / अंधार झाला असेल तर असंख्य काजवे दिसायचे. लोकलच्या खिडकी आणि दारातून येणार तो गार वारा आणि चेहर्‍यावर उडणारे पाण्याचे तुषार मनाला ताजंतवानं करायचे. ईथे नेदरलॅंन्ड्समध्ये खूप हिरवळ आणि पाऊस आहे पण त्याला त्या मुम्बईच्या धो धो पावसाची सर नाही.

ट्रिप 1 : साऊथ जर्मनी



आम्ही युरोप मध्ये असताना बर्‍याच छोट्या छोट्या  ट्रिप्स केल्या.  काही ट्रिप्स नवीन ठिकाणे बघण्यासाठी होत्या तर काही डिसनीलॅंड, लेगोलॅंड सारख्या थीम पार्कस मध्ये मजा करण्यासाठी होत्या.  काही ट्रिप्स हिवाळ्यात स्किईंग साठी आणि ख्रिसमस मार्केट बघण्यासाठी होत्या तर काही घरी आलेल्या पाहुण्यांना युरोप फिरवण्यासाठी होत्या.  आज मी ज्या ट्रिप बद्द्ल लहिणार आहे ती अशीच आमच्या अ‍ॅमस्टरडॅमच्या घरी उन्हाळयाच्या सुट्टीत रहायला आलेल्या पाहुण्यांना फिरवण्यासाठी केलेली ट्र्रिप आहे.

2015 च्या जून महिन्यात माझी बहीण व तिचा मुलगा आमच्या कडे अ‍ॅम्स्टरडॅमला यायचे ठरले होते.  पण काही कारणामुळे यायच्या एक आठवडा आधी पर्यंत त्यांचे येणे होते की नाही अशी परिस्थिती आली होती. त्यामुळे आम्ही कोणतीही ट्रिप प्लॅन करून बुकिंग करून ठेऊ शकत नव्हतो. सगळ्या अ‍डचणी पार करून ते जेव्हा अ‍ॅम्स्टरडॅमला पोचले तेव्हा मात्र ट्रिप ठरवण्यात आम्हाला खूपच घाई करावी लागली पण ती आमची सगळ्यात छान छोटी ट्रिप झाली.

अ‍ॅम्स्टरडॅम पासून पॅरिस, ब्रुसेल्स ही प्रक्षणीय शहरे खूपच जवळ म्हणजे 3 व 2 तासांच्या अंतरावर आहेत.  त्यामुळे ही शहरे ते स्वत:च एकटे जाउन बघणार होते. एक आठवडा अ‍ॅमस्टरडॅम व  नेदरलॅंड्स मधील इतर ठिकाणे बघण्यास लागणार होता.  त्यांच्या एकुण तीन आठवड्याच्या वास्तव्यात आमच्या बरोबर फिरण्यासाठी चारच दिवस आम्हाला मिळत होते.  वीकेंड ला जोडून दोन दिवस सुट्टी घेऊन चार दिवसाची छोटी ट्रिप आम्हाला पण सोयिस्कर ठरत होती.  आता किती दिवस जायचे ते तर ठरले पण कुठे जायचे हा मोठा प्रश्न होता.

युरोपमध्ये येऊन आल्प्स पर्वंत बघितले नाहीत तर ती युरोप ट्रिप पूर्ण होत नाही. आल्प्स हे युरोप मधले सर्वात उंच व विशाल पर्वत असून ते फ्रांस, स्वितझरलॅंड, इटली, मोनॅको, लिश्टेंन्स्टाईन,जर्मनी, ऑस्ट्रिया  आणि स्लोवेनिया अशा एकूण 7 देशांमध्ये 1200 किलोमीटर लांब पसरले आहेत. स्वितझरलॅंड जरा महाग आहे, इटली लांब आहे,  पॅरीस वगळता फ्रांस,  मोनॅको, लिश्टेंन्स्टाईन व स्लोवेनिया या देशांमध्ये फिरायचा काहीच अनुभव नव्हता.  असा विचार करत करत एकेक देश कमी होत गेले आणि आमचे जर्मनी व ऑस्ट्रिया च्या बॉर्डर ला जायचे ठरले. 2001 मध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी युरोप मध्ये आले होते तेव्हा जर्मनी, स्वित्झरलॅंड   व ऑस्ट्रिया या तिन्ही देशांच्या बॉर्डर वर असणार्‍या फ्रिड्रिक्सहाफेन नावाच्या गावामध्ये राहिले होते. या गावाबद्दल मी पुढे लिहिणारच आहे.  पण लंडनच्या हिथरो एअरपोर्ट  वरच्या थंडगार हवेच्या झुळुकेनंतर युरोपच्या प्रेमात पडायला लावणारे हेच ते गाव.  2001 नंतर तिथे परत जायची खूप इच्छा होती. हे सुध्दा एक कारण होतं साऊथ जर्मनी मध्ये जायचं.

आता पुढचा प्रश्न होता बुकिंग्स चा. हे सगळे प्लॅनिंग मंगळवारी चालू होते आणि आम्हाला जायचे होते येणार्‍या शनिवारी. फक्त तीन दिवस हातात होते. एवढ्या आयत्या वेळी ट्रेन चे रिझर्वेशन मिळणे शक्यच नव्हते. दुसरा पर्याय होता कार भाड्याने घेऊन जायचा.  युरोप मधले सगळे देश एकमेकांशी रस्त्यांनी चांगले जोडलेले आहेत. आणि हल्ली तर गुगल मॅप्स आणि कार मध्ये असणारे जी.पी.स यामुळे कुठेही रस्ता चुकायची भितीच नसते. पण आम्हाला साधारण 800 कि. मी. चा प्रवास करायचा होता. खाण्यापिण्याचे ब्रेक्स घेत आरामात 12 तास लागले असते. म्हणजे जवळ जवळ एक आख्खा दिवस वाया गेल्यासारखाच होता. शेवटी एकच पर्याय उरला होता तो म्हणजे विमानाने जाण्याचा.

आमचा पहिला स्टॉप असणार होता स्वित्झरलॅंड मधील शाफाहाउसेन (Shafaahausen). ते जर्मनी व स्वित्झरलॅंडच्या बॉर्डर जवळ आहे.  त्यामुळे आम्हाला झ्युरिक एअर्पोर्ट तसे सोयिस्कर होते. पण झ्युरिक विमानतळ हे एक अतिशय व्यस्त आंतर्देशिय विमानतळ असल्यामुळे एवढ्या आयत्यावेळी अ‍ॅम्स्टरडॅमहून झ्युरिकचे विमान तिकिट चांगलेच महाग होते. अशा वेळी एखादे छोटे विमानतळ चांगले उपयोगी पडते.  म्हणून आम्ही विमानाने बासेल ला जायचे ठरविले.

त्या आठवड्यातील शनिवारी सकाळी आठ वाजता अ‍ॅमस्टरडॅम ते बासेल विमानाने आमचा प्रवास चालू झाला.  जून महिन्याचा पहिला आठवडा होता. युरोप मधला उन्हाळा चालू झाला होता.  आणि आम्ही जेथे जाणार होतो तेथे उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविलेला होता. एकंदरीत वातावरण तापले होते :) .  युरोपची एक गंमत म्हणजे आपण जर विमानाने प्रवास करत असू तर एका तासात आपण एका देशातून दुसर्‍या देशात पोचलेलो असतो. बासेल ला पोचून सामान घेऊन बाहेर पडेपर्यंत दहा वाजले होते. बासेल विमानतळावरून ट्रेन स्टेशन वर जाण्यासाठी दर एहा मिनिटाला 50 नंबरची बस असते. त्या बसने आपाण 15 ते 20 मिनिटांत बासेल हॉप्ट-बाहनॉफ म्हणजेच मेन ट्रेन स्टेशन ला पोचतो.  युरोप मध्ये ट्रेन ने प्रवास करणे खूप सोपे आहे.  कोणत्याही स्टेशनच्या प्रत्येक प्लॅट्फ़ॉर्म  वर ट्रेन्स चे टाईमटेबल्स लावलेले असतात. आगमन (Arrival) आणि निर्गमन (Departure) चे वेगवेगळे चार्ट्स लावलेले असतात. प्रत्येक ट्रेन आठवड्याच्या कोणत्या दिवशी, कोणत्या प्लॅटफॉर्म वर , किती वाजता येणार, किती वाजता सुटणार अशी सगळी माहिती दिलेली असते.  विकेंड चे काही वेगळे टाईमटेबल असले तर ते पण दिलेले असते. त्यामुळे स्वत: माहिती काढत फिरणे खूप सोपे असते. हल्ली आपण आधीच सगळी माहिती  इंटरनेट वरून काढून ठेवू शकतो पण एखादा प्लॅन जर आयत्यावेळी केला असेल तरी युरोप मध्ये कधी फजिती उडत नाही.

बासेल  स्टेशन वरून आम्ही झुरिक मार्गे शाफाहाउसेन ला गेलो. शाफाहाउसेन  हे तिथल्या ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍र्‍हाईन फॉल्स साठी प्रसिद्ध आहे. तिथला हा र्‍हाईन नदीवरचा धबधबा विलक्षण सुंदर आहे. आपण तिथे बोट टुर घेऊ शकतो आणि धबधब्याच्या मध्ये असलेल्या उंच खडकावर जाऊ शकतो. आमच्या जवळ बरेच सामान होते आणि सगळे सामान घेऊन फिरणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही सगळे सामान स्टेशन वर लॉकर मध्ये ठेवले आणि दिवसभर मस्त फिरलो.



संध्याकाळी स्टेशनवर लॉकर मधून सामान काढले आणि ट्रेन ने दोन तासात फ्रिड्रिक्सहाफेन ला गेलो. फ्रिड्रिक्सहाफेन हे गाव बॉडेनझी (जर्मन भाषेत झी (see) म्हणजे तलाव) नावाच्या खूप मोठ्या तलावाच्या काठावर वसलेले आहे.  हा बॉडेनझी जर्मनी, स्वितझरलॅंड आणि ऑस्ट्रिया या तीन सुंदर देशांना जोडतो. विचार करा, तर हा बॉडेनझी च्या आजुबाजूचा परिसर किती सुंदर असेल.



फ्रिड्रिक्सहाफेनला आम्ही तीन दिवस राहणार होतो. आमचे हॉटेल सिटी क्रोन लेक व स्टेशन दोन्ही पासून खूपच जवळ होते.  हॉटेल मध्ये चेकिन केले व सामान ठेवले.  दिवसभर उन्हाने चांगलेच शेकून निघालो होतो. फ्रेश होऊन लेक च्या काठावर फिरायला बाहेर पडलो. लेकवर फिरताना 15 वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या होत होत्या.  जुन्या खूणा सापडत होत्या. त्यावेळी मित्र-मैत्रिणींबरोबर केलेल्या गमती जमती, ऑफिसमधून आल्यावर केलेले लॉंग वॉकस, आठवत तिथेच लेकवर रात्रीचे जेवण केले. एरवी खूप चूझी असणारा पण ईटालियन फूड मनापासून खाणारा माझा मुलगा तिथला “आला अराबियाता पास्ता" खाऊन एकदम खूष झाला आणि आपण दरवर्षी इथे यायचे असे ठरवून मोकळा झाला.  
फ्रिड्रिक्सहाफेन मधे लेकच्या काठावर उभे राहिले कि पलीकडे स्वित्झरलॅंडमधील आल्प्स पर्वत दिसतात. रोजच्या हवामानप्रमाणे हे आल्प्स पर्वत रंग बदलत असतात. कधी ते निळेशार दिसतात तर कधी हिरवेगार. थंडी वाढली कि डोंगरांवर पांढरी छ्टा दिसू लागते. असे वाटते देव आकाशात बसून रोज नवे पेंटिग काढत आहे.  फ्रिड्रिक्सहाफेनला या लेकमध्ये एक मेटल चा साधारण आठ-नऊ मजली उंच टॉवर बनविलेला आहे.  या टॉवर वरून आख्खे फ्रिड्रिक्सहाफेन गाव दिसते.  ते विहंगम दृश्य आणि टॉवरवरची वार्‍यामुळे वाजणारी थंडी ते क्षण मनात कायमसाठी कोरून टाकतात.







दुसर्‍या दिवशी सकाळी कार भाड्याने घेऊन आम्ही ब्लॅक फॉरेस्ट मधील टिटीझी ला गेलो. दोन तासाच तो रस्ता नयनरम्य होता.  टिटि-झी म्हणजे इथे पण लेक आलाच. पण हा लेक हिरव्यागार दाट झांडानी वेढलेला आहे. इथले जंगल एवढे दाट आहे की ते लांबून काळे दिसते म्हणून त्याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. टिटीझी च्या लेक मध्ये बोटिंग व रोईंग केले, कुकू क्लॉक च्या दुकानात चक्कर टाकला, थोडेफार शॉपिंग केले व दिवस मस्त मजेत घालवला. 







संध्याकाळी परत फ्रिड्रिक्सहाफेनला आलो. टॉवर वर टाईमपास केला, खूप फोटो काढले. युरोपमध्ये ठिकठिकाणी टर्किश पदार्थांचे स्टॉल्स आहेत. डोनर कबाब, फलाफल हे प्रसिद्दध टर्किश  पदार्थ तिथे मिळतात. त्यात व्हेज आणि नॉन्व्हेज हे दोन्ही पर्याय असतात. 2001 मध्ये आम्ही जिथे नेहमी जायचो अश्या "ईझमिर कबाब"  रेस्टॉरंट मध्ये जाऊन ताव मारला आणि तृप्त झालो.

तिसर्‍या दिवशी सकाळी ऊठून कार ने नॉय श्वानस्टाईन कॅसल च्या दिशेने रवाना झालो.  

हा पण दोन तासाचा रस्ता फारच सुंदर होता. जर्मनीच्या या भागात कार ने प्रवास करताना आजूबाजुला असणारे आल्प्स पर्वत, हिरवी कुरणे (मिडोज), जर्मनीचे उत्तम रस्ते आपल्याला कधीच दमवत नाहीत. नॉय श्वानस्टाईन कॅसल चे


तिकिट्स काढायला खूप मोठी रांग असते. आम्ही आधीच ऑनलाईन बूकिंग करून ठेवले होते म्हणून आमचा खूप वेळ वाचला. साधारण एक तासाची कॅसल च्या आत मध्ये इंग्रजी भाषेतून माहिती देणारी टुर असते. आल्प्स पर्वतांनी वेढलेला हा कॅसल एका डोंगरा वर आहे. पायथ्यापासून कॅसल पर्यंत पोचायला चालत पाऊण तास लागतो. चढ चांगलाच आहे.  वरती चढून जाण्यासाठी घोडागाड्या किंवा बसेस पण असतात. पण  हिरव्यागार झाडांनी झाकलेल्या रस्त्यावरून चालत जाताना मजा येते. युनेस्को ची ही "वर्ल्ड हेरिटेज साईट" , परिकथेतला हा कॅसल प्रत्यक्ष बघून सगळा थकवा पळून जातो.

हिरव्यागार झाडांनी झाकलेला रस्ता 



सगळी नयनरम्य दृश्ये डोळ्यात साठवून संध्याकाळी फ्रिड्रिक्सहाफेनला परत आलो. लेकवरच थाय फूडचा डिनर केला. एल लांबलचक फेरफटका मारून हॉटेलला परत गेलो. एकाच हॉटेल मध्ये मुक्काम केल्यामुळे सामानाची नाचानाच करावी लागली नाही.  कार प्रवासामुळे खूप सुटसुटीत ट्रिप झाली.
शेवटच्या म्हणजे चौथ्या दिवशी भाड्याते घेतलेली कार परत केली आणि दुपारी  बाराच्या सुमारास ट्रेन ने परतीचा प्रवास सुरू केला.  फ्रिड्रिक्सहाफेन-ऊल्म-फ्रॅंकफर्ट-अ‍ॅम्स्टरडॅम असा कधी नॉर्मल ट्रेन ने तर कधी जर्मनीच्या प्रसिद्ध आय.सी. ई ने प्रवास करत रात्री उशिरा घरी पोचलो.


#travelblog #travelblogger #europetravelblog

















Comments