पावसाची एक आठवण

माझे घर डोंबिवलीला आणि कॉलेज ठाण्याला होते. कॉलेजमधुन घरी जाताना पावसात भिजायला खूप मजा यायची. मुंबईच्या धो धो पावसात छत्रिचा काहीच उपयोग नसतो. 25 वर्षांपूर्वी , आताच्या मानाने रस्ते खुपच मोकळे असायचे. तेव्हा मैत्रिणिंच्या घोळक्यात बिनधास्त , एकमेकिंच्या अंगावर पाणि उडवत , हसत खिदळत , भिजून घरी जायचो. खूप तणावविरहित दिवस होते ते. लोकल ने घरी जाताना दिवा स्टेशन गेल्यावर डोंबिवलिच्या खाडीचा परिसर हिरवागार झालेला असायचा. संध्याकाळी खूप उशीर / अंधार झाला असेल तर असंख्य काजवे दिसायचे. लोकलच्या खिडकी आणि दारातून येणार तो गार वारा आणि चेहर्‍यावर उडणारे पाण्याचे तुषार मनाला ताजंतवानं करायचे. ईथे नेदरलॅंन्ड्समध्ये खूप हिरवळ आणि पाऊस आहे पण त्याला त्या मुम्बईच्या धो धो पावसाची सर नाही.

युरोपचे पहिले दर्शन



2001 साली पहिल्यांदा युरोपच्या धरतीवर पाय ठेवला आणि मी युरोपच्या प्रेमातच पडले. मुंबई ते लंडन माझा आयुष्यातला पहिला विमान प्रवास. लंडनहून आम्हाला पुढे फ्रॅंकफ़र्ट ला जाणारे विमान पकडायचे होते.  

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वरून विमानात प्रवेश करताना एका बोगद्यासारख्या पुलावरून जावे लागते आणि आपण डायरेक्ट विमानाच्या आत पोचतो. एअर इंडियाच्या त्या विमानात संपूर्ण भारतीय वातावरण होते, साडी नेसलेल्या , कुंकू/ टिकली लावलेल्या एअरहोस्टेस, भारतीय जेवण, आजुबाजूला सर्वधर्मीय भारतीय आणि त्यांच्या गप्पा.  या सगळ्या ओळखिच्या उबदार वातावरणात, पहिला वहिला एकटीने करत असलेला विमान प्रवास आणि तो ही परदेशी याची असलेली उत्कंठता , आदल्या दिवशीची सामान ( म्हणजेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी सुचवलेल्या जमेल तेवढ्या सगळया वस्तू ) बॅगेत भरताना झालेली धावपळ आणि आता खूप दिवस घरचे भेटणार नाहीत याची असलेली हूरहूर, अशा संमिश्र मनस्थितीत  मी आणि माझी मैत्रिण दमून झोपी गेलो. आठ तास कसे गेले ते कळलेच नाही. 

 मुंबईहून निघालेले एअर इंडिया चे विमान जेव्हा लंडनच्या हिथरो एअरपोर्ट वर उतरलले तेव्हा आत्तापर्यंत उबट झालेल्या त्या विमानाच्या दारातून बाहेर आल्यावर, अनपेक्षितपणे, मंबई  विमानतळासारख्या बोगदेवजा पूलावरून न जाता जेव्हा कोणतेही छत नसलेल्या जिन्याच्या शिडीवर पाऊल ठेवले, तेव्हा एक अतिशय थंड वा‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍र्‍याची झूळूक स्पर्श करून गेली. आत्तापर्यंतचा सगळा शीण पळून गेला आणि त्याच क्षणी मी युरोपच्या प्रेमात पडले. 

आत्तापर्यंत माझा लंडनशी तेवढाच संबध आला, मी अजून लंडन बघितले नाही आहे पण युरोप खूप बघितला. युरोप मुळातच खूप संदर आहे.  आणि या संदरतेला जोड आहे ती तिथल्या स्वच्छतेची, तिथल्या लोकांच्या शिस्तीची. युरोप मध्ये बघण्यासारखी असंख्य ठिकाणे आहेत.  आणि जर का तुम्ही युरोप मध्येच रहात असाल तर तीन चार दिवसाच्या किंवा एका आठवड्याच्या खूप छान छोट्या ट्रिप्स करता येतात.  अश्याच अनेक छोट्या ट्रिप्स व त्यांचे प्लॅनिंग याबद्दल मी या ब्लॉगवर लिहिणार आहे.  तर वाचत रहा !!!

#travelblog #travelblogger #europetravelblog

Comments