लहान असताना आपण भुगोलाच्या पुस्तकात सगळ्या ऋतुंबद्दल शिकलेलो असतो. पण आपणा मुंबईकरांना माहीत असतात ते फक्त पावसाळा आणि उन्हाळा. मुंबईत हिवाळा कधी येतो आणि कधी जातो कळत पण नाही. लोकरीचे कपडे तर कधी वापरावे पण लागत नाहीत. पण याऊलट युरोप मध्ये सगळे ऋतु खूप ठळकपणे दिसून येतात. तिथे वर्षभर कधीही अधून मधून पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळा असा वेगळा ऋतु नसतो. पण वसंत (स्प्रिंग), ग्रीष्म म्हणजे उन्हाळा (समर), शरद (ऑटम) आणि हिवाळा हे ऋतु खूप स्पष्टपणे दिसून येतात.
वसंत (स्प्रिंग) : मार्च ते एप्रिल
साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्या नंतर थंडीचा जोर जरा कमी झालेला असतो. झाडांवर गुलाबी रंगाच्या छोट्या कळ्या दिसू लागतात. 8-10 दिवसांत सगळ्या कळ्या उमलून आख्खे झाड फुलांनी भरलेले असते. त्या गुलाबी झाडांचे किती फोटो काढू आणि किती नको असे होते.
 |
| वसंत (स्प्रिंग) |
 |
| फुलांनी बहरलेले झाड |
 |
| स्प्रिंग |
स्प्रिंग तसा छोटाच असतो. एप्रिलच्या तीसर्या आठवड्यापर्यंत सगळी फुले गळून पडतात आणि झाडांवर पोपटी रंगाची पालवी फुटलेली दिसू लागते. मे महिना उजाडेपर्यंत झाडे हिरवीगार झालेली असतात. हवेचे तापमानही वाढू लागते आणि युरोप मधला उन्हाळा सुरू होतो.
ग्रीष्म / उन्हाळा (समर) : मे ते ऑगस्ट
 |
| हिरवेगार अॅमस्टलफीन |
 |
| आवडते अॅमस्टरडॅमचे जंगल |
 |
| हिरवागार उन्हाळा |
उन्हाळा चांगला चार महिने टिकतो. तापमान 10 डिग्री ते 30 डीग्री च्या मध्ये असते. म्हणजे मुंबईतल्या हिवाळ्यासारखे किंवा त्यापेक्षा गारच. उन्हाळा असला तरी एखादे जॅकेट घालावेच लागते. असे दिवस फारच कमी असतात की जॅकेटची अजिबात गरज नाही. अॅमसटरडॅमच्या चार वर्षाच्या वास्तव्यात असे लक्षात आले की निदान अॅमस्टरडॅम मध्ये तरी जर का सलग चार दिवस ऊन पडले तर पाचव्या दिवशी पाऊस पडलाच पाहिजे. क्वचित कधी तरी, एखादा आठवडा तापमान 30 डीग्री च्या वर जाते. युरोपचे स्ठान भारताच्या उत्तरेला सात ते आठ हजार किलोमीटर वर आहे. भारतापेक्षा उत्तर ध्रुवाच्या जास्त जवळ असल्यामुळे असेल कदाचित तिथे ऊन खूप टोचते. त्यात भर म्हणजे तिथल्या घरांमध्ये किंवा हॉटेल्स मध्ये पंखे नसतात. उकाडा वाढल्यावर घराच्या खिडक्या उघडणे हाच एक पर्याय असतो. किंवा काही घरांमध्ये छोटे टेबल फॅन्स दिसून येतात. पण उन्हाळा खूपच आल्हाददायक असतो. दिवसही खूप मोठा असतो. रात्री अकरा पर्यंत चांगला उजेड असतो. जुलै ऑगस्ट मध्ये तिथल्या शाळा कॉलेजेस ला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. नोकरदार वर्गाची उपस्थिती पण कमीच असते. सगळेच सुट्टीवर जातात.
शरद (ऑटम) : सप्टेंबर - नोव्हेंबर
एखाद्या वर्षी सप्टेंबरही चांगला कोरडा जातो. हळूहळू झाडाची पाने पिवळी होऊ लागतात. ऑक्टोबर पासून थंडी चांगलीच जाणवायला लागते. उन्हाळ्यात जे झाड हिरवेगार असते ते आता पिवळे लाल दिसू लागते. पाने गळू लागतात. सगळे रस्ते त्या रंगबिरंगी पानांनी आच्छादित होतात. तसा निसर्ग आपल्याला भारतात कधी बघायला मिळत नाही.
 |
| ऑटम मधला रोजचा स्टेशनवर जायचा नयनरम्य रस्ता |
 |
| लाल-पिवळे झाड |
 |
| रोजचा स्टेशनवर जायचा नयनरम्य रस्ता |
हिवाळा : नोव्हेंबर - फेब्रुवारी
नोव्हेंबर च्या शेवटी चांगलीच थंडी पडायला लागते. डिसेंबर पर्यंत झाडावर एकही पान शिल्लक नसते. राहतात त्या फक्त फांद्या. अंगावरच्या बारीक जॅकेटची जागा आता चांंगल्या जाड जॅकेटने घेतलेली असते. सोबतीला लोकरीचे स्वेटर, स्कार्फ, टोपी, हॅन्ड ग्लोव्हज गरजेप्रमाणे असतातच. दिवसही खूप लहान झालेला असतो. दुपारच्या चार वाजे पासून दुसर्या दिवशीच्या सकाळच्या आठ पर्यंत गुडुप अंधार असतो. स्नो फॉल होऊन जेव्हा सगळ्या घरांची छ्परे, सगळे रस्ते व मोकळ्या जागा बर्फाच्छादीत होतात तेव्हा हिवाळा सुध्दा फोटोजनीक होतो.
 |
| एकही पान शिल्लक नसलेली हिवाळ्यातली झाडे |
 |
| बर्फाच्छादीत अॅमस्टलफीन |
 |
| हिवाळ्यातले फोटोजनीक अॅम्स्टरडॅम |
प्रत्येक ऋतु मध्ये निसर्ग वेगळेच रूप दाखवत असतो, वातवरण वेगळे असते. त्या वेळी साजरे केले जाणारे सण आणि उत्सव त्या ऋतुची ओळख बनून शान वाढवत असतात. सगळेच ऋतू बघण्यासरखे असतात. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. युरोपमध्ये कोणाला सुंदर फोटो काढायला जायचे असते तर कोणाला स्कीईंगसाठी जायचे असते. कोणाला कुटंबियांना भेटायला जायचे असते तर कोणाला नुसतेच रिलॅक्स व्हायला जायचे असते. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळा ऋतु सोयिस्कर ठरू शकतो.
पण जेव्हा "युरोप मध्ये फिरण्यासाठी सर्वात उत्तम ऋतु कोणता?" या प्रश्नाचे उत्तर शोधायची वेळ येते तेव्हा व्याव्हारिक दृष्ट्या विचार करून, सहन करण्याजोगे तापमान असणारा, मुलांच्या सुट्ट्यांचा प्रश्न सोडवणारा, लोकरीचे जाडजूड कपडे बरोबर न्यावे न लागळ्यामुळे बॅगेचे वजन कमी करणारा सर्वजगमान्य उन्हाळा जिंकतो.
Comments
Post a Comment